तारापूर: दि. २४, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सालवी केमिकल या कंपनीतून दि. १३/१०/२०२१ रोजी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास कंपनीतील घातक रासायनिक सांडपाणी बाहेर उघड्यावरती व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या गटरांमध्ये सोडले जात असतानाचा व्हिडीओ अभिषेक सिंग व अमर सिंग या दोन युवकांनी काढला होता. त्यावेळी कंपनीने अभिषेक सिंग व अमर सिंग यांना पैशाचे अमिष देत याबाबत तक्रार व व्हिडीओ न देण्यास सांगितले परंतु अभिषेक सिंग याने पैसे नको काही तरी काम द्या असे सांगितल्याचे अभिजीत सिंगने सांगितले.

यानंतर दि. २२/१०/२०२१ रोजी १२.०० वाजता मनोज सिंग याने अभिषेक सिंगला काम देण्यासाठी व त्या बाबत चर्चा करण्यासाठी बोलावले व लेबर कॉन्ट्राक्ट बाबत चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी सध्याचा लेबकर कॉन्ट्राक्टर आशोक भुजबळ व त्याचे साथीदार गणेश काळे, प्रविण महाजन व मॅनेजर मनोज सिंग यांनी अभिषेक सिंग यास जबरी मारहाण केली आहे. अभिषेक सिंगवर तुंगा हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. अभिषेक सिंगला वाचवण्यासाठी गेलेलेल्या अमर सिंगला ही मारहाण करण्यात आल्याचे समजते त्याच्यावर उपचार करून त्याला सोडून दिले आहे. या प्रकरणी दि. २३/१०/२०२१ रोजी हॉस्पिटल मध्ये जावून बोईसर एमआयडीसी पोलीसांनी घेतलेल्या माहितीनुसार सालवी केमिकलचे मॅनेजर मनोज सिंग, लेबर कॉन्ट्राक्टर आशोक भुजबळ व साथीदार गणेश काळे, प्रविण महाजन यांच्यावर कलम ३२४, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
वारंवार पर्यावरण कायद्याचे व नियमांचे उल्लंघन करून प्रदूषण करणाऱ्या सालवी केमिकलवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करणार ते पाहावे लागेल.