"दिड महिन्यात त्याच कंपनीत त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा भिषण आग" 

तारापूर: दि.०३, सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास बजाज हेल्थकेअर लि. या कंपनीत भीषण आग लागली ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्यांसह जवानांना जवळपास दिड तास अथक परिश्रम करावे लागले. सुदैवाने वेळीच सर्व कामगारांनी सावध भूमिका घेत पळ काढल्याने कोणास ही इजा / दुखापत वा जीवीत हानी झाली नाही.

मागील 13 फेब्रुवारी रोजी याच कंपनीत याच ठिकाणी झालेल्या अग्निकांड मध्ये निलेश बोरसे 28 हे 90% भाजल्याने यांचा उपचारादरम्यान 19 फेब्रुवारी रोजी नॅशनल बर्न हॉस्पिटल नवी मुंबई येथे मृत्यू झाला होता. तर दोन कामगार जखमी झाले होते. 

यानंतर लगेचच दिड महिन्याच्या आत आज दिनांक 3 एप्रिल रोजी याच ठिकाणी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याने कंपनी मालक व व्यवस्थापन, औद्योगिक सुरक्षा विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कंपनी मालकाने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एन झोनमधील प्लॉट नंबर 216, 217, 128 व 221 असे लगतचे चार प्लॉट एकत्रित करून प्रत्येक प्लॉटवर वेगवेगळे विद्युत कनेक्शन व वेगवेगळे पाणी कनेक्शन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र घेऊन कायद्यातील त्रुटींचा फायदा घेत एकत्रीत उत्पादन प्रक्रिया करित असल्याने, यातील 216 व 217 या  कंपनीला (विना परवाना FDA व्दारा परवानगी आवश्यक असलेल्या औषधांचे उत्पादन घेतले जात असल्याने व यामुळेच चुकीच्या कार्य पद्धतीमुळे 13 फेब्रुवारीची आग्निकांडाची घटना घडल्याने) उत्पादन बंद करण्याचे आदेश दि.19 मार्चला दिले असतानाही प्लॉट नंबर 128 मधील विद्युत पुरवठा व पाणीपुरवठा यांचा वापर करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उत्पादन बंदच्या आदेशाचे उल्लंघन करत उत्पादन प्रक्रिया चालू असल्याची माहिती समोर आली आहे. 

या सर्व प्रकारामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण असून बजाज हेल्थकेअर लि. या कंपनीतील शेकडो कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झालेला असून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांच्याकडून व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या कंपनी वर व कंपनी मालकावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक व कामगारांनी केला आहे. 

आगीचे कारण अध्याप समजू शकले नसून बोईसर एमआयडीसी पोलीस याबाबत पुढिल तपास करित आहेत.