केमिकोन कंपनीतील रासायनसाठा टाकी फुटल्याने परिसरात भीतीचे वातावरण ...

"फॉर्मलडिहाइड" या रसायनाचा साठा असलेली सिंटेक्सची टाकी फुटल्याने रसायन बाहेरपडून निर्माण झालेल्या विषारी वायुमुळे 1 महिला गंभीर तर 6 कामगारांना किरकोळ बाधा"

तारापूर : दि. 7, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में. केमिकोन केमिकल्स प्रा. लि. प्लाट नंबर डब्ल्यू - 16 व 26 या कंपनीतील "फॉर्मलडिहाइड" या रसायनाचा साठा केलेली 20 टन क्षमतेची टाकी सकाळी 7 वाजताच्या सुमारास आचानक फुटल्याने हे रसायन बाहेर पडताल्याने वातावरणातील हवेशी संपर्कात येऊन मोठ्याप्रमाणावर विषारी वायुची निर्मिती झाली. यामुळे आजूबाजूच्या जवळपास 50 हून अधिक कंपन्यांमधील कामगारांना व रस्त्यावरून जाणाऱ्या शेकडो नागरिकांना डोळ्यांना जळजळ व डोके दुखी, घशास ञास जाणवू लागल्याचे समजते. 

या कंपनीला लागूनच असलेल्या डब्ल्यू 24 या कंपनीत काम करणारी महिला दामिनी भगवान सिंग, (21) हिला मोठ्याप्रमाणावर बाधा झाल्याने एमआयडीसीमधील तुंगा हॉस्पीटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, सध्या तीची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. तर इतर 6 कामगारांना किरकोळ बाधा झाल्याने त्याच्यावर प्रथमोपचार करून सोडून देण्यात आले आहे. 

केमिकोन कंपनीत टेक्सटाईल एझल्रिजचे उत्पादन घेतले जाते, ही कंपनी प्रमोद मेहता यांच्या मालकीची असून, मागील वर्षी याच कंपनी मालकांच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील हिमसन केमिकल प्लाट नंबर एन 75 याकंपनीत बॉयलरचा स्फोट झाला होता. केमिकोन या कंपनीत 10 ते 12 कामगार काम करत आहेत. कंपनी सकाळी 8 ते 5 याच वेळेत चालू असते तर राञी फक्त एक वॉचमन असतो यामुळे सकाळी 7 वाजता ही टाकी कशी फुटली याचे कारण समजू शकले नाही. या रसायनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांसह 10 ते 12 जनांना तब्बल 6 तास मशक्कत करावी लागली. तर सुरक्षिततेच्या दृष्टिने आजूबाजूच्या परिसरातील जवळपास 50 कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. 

तारापूर औद्योगिक क्षेत्रात वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे कामगार व नागारिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

याबाबत बोईसर एमआयडीसी पोलीस स्टेशनमधे अपघाताची नोंद करून पुढिल तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभाग ही याप्रकरणी चौकशी करित आहेत.