काहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरावर खरचं घातक परिणाम होतात का?

आपल्याला नेहमी मोठ्यांकडून सांगितलं जातं आणि कधी कधी आपण देखील आपल्या लहानग्यांना सांगतं असतो की, काहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. पण जर आपण यामागचं कारण विचारलं तर मात्र काही स्पष्ट उत्तर मिळत नाही. मग मनात अनेक प्रश्न येतात. जसे की –

खाल्ल्यानंतर  लगेच पाणी पिणे खरंच चांगल नसतं का? की घरातले उगीचच काहीतरी अफवा कवटाळून बसलेत? त्यांना तरी या मागचं खरं कारण माहित आहे का? वगैरे..वगैरे!!

चला तर मग आपण यामागचं तथ्य जाणून घेऊ. म्हणजे आपल्या लक्षात येईल, खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे खरंच चांगल आहे की नाही?!

सरळ सरळ सांगायचं झालं तर –

जेवण करून झाल्यावर किंवा काही खाल्ल्यानंतर तुम्ही लगेच पाणी प्यायलात तर त्याचा पचनक्रियेवर कोणताही परिणाम होत नाही.

आणि हे आम्ही नाही, तर विज्ञान स्वत: म्हणतं. त्यामुळे हे स्पष्ट होतं की,

खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये असं जे सांगण्यात येतं, त्याने शरीरावर काहीही उलट परिणाम होत नाही, ती केवळ काही दिवसांपासून पसरलेली वदंता आहे.

ही अफवा कशी? हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला पचनक्रिया समजून घेणे गरजेचे आहे.

तुम्ही तोंडात घास टाकता आणि चावता, तेथून पाचनक्रियेला सुरुवात होते. चावताना निर्माण होणारी लाळ अन्नाचा गिळण्यास सुलभ असा घास तयार करण्यास मदत करते. लाळेत जी एंझाइम असतात ती अन्नातील कार्बोहायड्रेट घटकांच्या विघटनास सुरुवात करतात. तेथून ते अन्ननलिकेमधून सरळ पोटात पोचते.पोटात पोचल्यावर अन्नावर जठररसाची क्रिया होते, यातून अर्धद्रव पदार्थ तयार होतो, त्याला ‘आमरस’ (काइम) म्हणतात. हा आमरस तेथून आतड्यांमध्ये प्रवेश करतो.

पुढे अधिक प्रक्रिया होऊन अन्नाचे अभिशोषण होते. नको असलेला अन्नाचा भाग अर्थात शरीराबाहेर टाकण्यापूर्वी साठवून ठेवला जातो व त्यातील बरेचसे पाणी शरीरात परत शोषून घेतले जाऊन तो गुदद्वारावाटे बाहेर टाकला जातो.  ही काही एका झटक्यात होणारी प्रक्रिया नाही, ही संथ प्रक्रिया असून त्यासाठी मोठा कालावधी लागतो.

तर गैरसमज असा आहे की, जर तुम्ही काहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायलात तर पचनक्रिया नीट होत नाही.

काही जण तर असेही म्हणतात की, खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीर त्या अन्नातील आवश्यक पोषकतत्वे खेचून घेऊ शकत नाही आणि ते खाल्लेले अन्न थेट मलोत्सर्जनातून बाहेर टाकले जाते.

परंतु या संदर्भात विज्ञान असे म्हणते की –

द्रव पदार्थाचे पचन हे घन पदार्थापेक्षा जलद आणि लवकर होते आणि ते कोणत्याही प्रकारे घन पदार्थाच्या म्हणजेच अन्नाच्या पचनक्रियेमध्ये अडथळा निर्माण करत नाही.

तसेच शरीरात निर्माण होणाऱ्या आमरसामध्ये पाणी मिसळल्यास देखील त्याचा कोणताही परिणाम होत नाही. उलट खाताना पाणी प्याल्याने पचनक्रिया सुरु होताना अन्नाचे लहान लहान कणांत विघटन करण्यात मदतच होते.

अजून एक विशेष गोष्ट म्हणजे एका संशोधनाचा असाही दावा आहे की, अन्न खाताना पाणी प्याल्याने चयापचय क्रियेला (metabolism) चालना मिळते.

तर मग वाचकहो, जर तुम्हाला यापुढे कोणीही काहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्यास मज्जाव केला, तर त्यांचा हा गैरसमज दूर करा.

सौजन्य. inमराठी.com